Test Update

उत्सव, उत्साह आणि प्रबोधन


उत्सव, उत्साह आणि प्रबोधन

समाजप्रबोधनाचे व संस्कारांचे महत्त्व लक्षात घेतले, तर आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो. सार्वजनिक गणेशोत्सवामधील चुकीच्या गोष्टींविरोधात प्रभावी समाजप्रबोधन करण्यात आले, तर त्याचा नक्कीच चांगला उपयोग होऊ शकेल. 


जन प्रबोधन प्रभावीपणे केले

तर त्याचा परिणाम समाजसुधारणेत होऊ शकतो हे मागील काही उदाहरणांनी आपणास दाखवून देता येईल. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. सर्वत्र तीव्र पाणीटंचाई झाली होती. त्यावर्षी होळी पौर्णिमेचा सण साजरा करतांना 'सुकी होळी खेळा' असा संदेश लोकांना देण्यात आला होता. त्यावर्षी मुंबईसारख्या अनेक शहरातून लोकांनी सुकी होळी खेळून पाण्याचा गैरवापर टाळला होता. दिवाळीसारख्या सणामध्ये 'ध्वनिप्रदूषण करणारे फटाके लावू नका' असा प्रचार शाळाशाळांतून करण्यात आला. मुलेच आई-वडिलांना सांगू लागली, 'आम्ही फटाके लावणार नाही. टीचरनी आम्हाला सांगितले आहे.' 

मागील काही वर्षे मोठ्या आवाजाचे फटाके लावण्याचे प्रमाण नक्कीच कमी झाले आहे. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम कळल्यावर लोकांनी आपणहून प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरणे सुरू केले. गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिल्यावर अनेक लोकांनी त्याचा वापर सुरू केला. स्थिर सरकारचे महत्त्व पटल्यानंतर लोकांनी स्थिर सरकार निवडून दिले. धूम्रपानाचे दुष्परिणाम पटवून दिल्यानंतर धूम्रपानाचे प्रमाण कमी झाले आहे. रस्त्यावर थुंकणे, कचरा फेकणे इत्यादी गोष्टींतही सुधारणा होऊ लागली आहे. लोकांवर झालेल्या संस्कारांचे दर्शन मुंबईत २६ जुलै २००५ रोजी पाणी साचून जीवितहानी व वित्तहानी झाली त्यावेळी झाले होते. अडलेल्या अनेक लोकांना मुंबईकरांनी मदत केली होती. अशी अनेक उदाहरणे पाहिली, की समाजप्रबोधनाचे व संस्कारांचे महत्त्व आपल्या लक्षात येते. तसेच याबाबत आपला सकारात्मक दृष्टिकोन रहावयास मदत होते. सार्वजनिक गणेशोत्सवामधील चुकीच्या गोष्टींविरोधात प्रभावी समाज प्रबोधन करण्यात आले तर त्याचाही चांगला उपयोग होऊ शकेल. 

श्रीगणेशपूजेचा प्रारंभ सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी झाला असावा. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला करावयाचे पार्थिव गणेश पूजन हे एक व्रत आहे. या व्रताचे रूपांतर उत्सवात झाले. श्रीगणेश पुराण आणि श्री मुद्गलपुराण हे गणेश विषयक प्रमुख ग्रंथ आहेत. श्रीगणेश हा सुखकर्ता आहे, तो दु:खहर्ता आहे. तो विघ्ननिवारक आहे. तो चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती आहे. तो बुद्धिदाता आहे अशी उपासकांची श्रद्धा आहे. आधुनिक काळात श्रीगणेश हे दैवत अधिक लोकप्रिय झाले आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यांत शेतामध्ये धान्य तयार होत असते. अशावेळी पार्थिव म्हणजे मातीच्या गणेशमूर्तीचे पूजन करून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. कोणत्याही देवतेची पूजा ही निसर्गशक्तीची, आदर्शाची पूजा असते. चांगला बदल व्हावा, मन एकाग्र व्हावे,माणसाने कर्मप्रवृत्त व्हावे, पर्यावरण जपण्याची जाणीव व्हावी असा उद्देश असतो. 

लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये घराघरातील उत्सवाबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली. त्यामागचा त्यांचा उद्देश होता की सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्र येतील. ते एकत्र आल्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांच्या मनात जागृती निर्माण करता येईल. गणेशोत्सव धार्मिक असल्यामुळे इंग्रज सरकार त्याला अडथळा करू शकणार नाही. लोकमान्य टिळकांच्या या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उपक्रमामुळे त्यांचा मूळ उद्देश फलद्रुप होण्यास खूप सहाय्य झाले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा चालूच राहिली. 


गणेशोत्सवा


गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठी आर्थिक उलाढाल होत असते. वर्गणी ऐच्छिक असावी, हिशेब तपासणे सक्तीचे असावे. उत्सवाचे मार्केटिंग होऊ नये एवढी तरी काळजी घेतली जावी ही लोकांची अपेक्षा असते. अनेक गणेशोत्सव मंडळे निधी जमविण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना राबवीत असतात. 'नवसाला पावणारा राजा' अशी जाहिरात करून आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत असतात. इथे लोकांच्या श्रद्धेचा उपयोग करून घेतला जातो. देव नवसाला पावत नाही. देव नवसाला पावत असता, तर मग नवस बोलून आजार बरे करता आले असते, बेरोजगारीचा प्रश्न सोडविता आला असता, नैसर्गिक आपत्ती टाळता आल्या असत्या. या गोष्टी जर प्रभावीपणे पटवून दिल्या गेल्या तर नवसाची रांग नक्कीच कमी होऊ शकेल. 

सध्या पाटपूजा, पाद्यपूजा, पावतीपुस्तक पूजा वगैरे गोष्टींही करण्यात येऊ लागल्या आहेत. या मार्गानेही गर्दी जमवून निधी संकलनाचा प्रयत्न केला जात आहे. गणेशमूर्तीकार मूर्ती तयार करण्यापूर्वी मूर्ती ज्या पाटावर ती तयार केली जाते त्याची पूजा करीत असतात. पण आजवर त्याचे सार्वजनिक प्रदर्शन केले जात नव्हते. षोडशोपचार पूजेमध्ये 'पाद्यपूजा' हा एक विधी आहे. पण फक्त एक पाय तयार करून त्याची पाद्यपूजा करणे योग्य नाही. संपूर्ण मूर्तीची पूजा करताना 'पाद्यपूजा' करणे योग्य होईल. साधू-संत, गुरू यांचीही पाद्यपूजा करण्याची प्रथा आहे, त्यांचा 'एक पाय' आणून पूजा केली जात नाही. गणेशमूर्तीचा एक पाय तयार करून त्याची पूजा करून गर्दी जमविण्याचे प्रकार बंद व्हावयास हवेत. लवकरच नवरात्रोत्सव येत आहे. त्यावेळीही दुर्गामातेचा एक पाय अगोदर तयार करून पाद्यपूजा करून गर्दी व निधी जमविण्याचा विचार काही नवरात्रोत्सव मंडळांनी केला असल्याचे समजते. 

गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण


सार्वजनिक गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या अत्याधुनिक ध्वनिवर्धकांचा वापर करण्याची स्पर्धाच सुरू असते. केवळ कायद्याने या प्रकाराला आळा बसणार नाही. येथेही ध्वनिप्रदूणाचे दुष्परिणाम लोकांना पटवून देण्याची गरज आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन करताना गेल्या वर्षी अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. मुंबईत समुद्रात बुडल्याने एका मुलाचा मृत्यू झाला होता. वाहत्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मुळात वाहते स्वच्छ पाणी तरी कुठे आहे? पिण्यासाठी पाणी नाही, तर मग गणेशमूर्तींचे विसर्जन वाहत्या पाण्यात करणे कसे शक्य आहे? गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करणेच योग्य होईल. सध्या लोक कृत्रिम तलावांचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत ही चांगली गोष्ट आहे. 

सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये कलावंतांचे कार्यक्रम जरूर असावेत. परंतु त्याबरोबरच समाजप्रबोधनाचेही कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. मंडळांनी वर्षभर मुलांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम आयोजित करावेत असे सर्वसामान्य लोकांनाही वाटत असते. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. कार्यकर्त्यांना अगोदर प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केल्यास उत्तम कार्यकर्ते व नेतृत्व करणारी माणसे तयार होऊ शकतील. पुरुष गणेशसेवकांप्रमाणेच महिलांसाठी महिला 'दुर्गा सेविकाही'तयार करता येतील. 

आपल्या सनातन वैदिक धर्माची मुख्य शिकवण आहे, की 'माणसाने माणसांशी माणसासारखे वागावे. निसर्गाचे रक्षण करावे.' या गोष्टींचाही प्रचार उत्सवाच्या निमित्ताने करता येईल. महर्षी व्यास व संत तुकारामांनी पाप-पुण्याची सोपी व्याख्या केली आहे. इतरांना मदत करणे ते पुण्यकर्म व इतरांना त्रास होईल अशी कृती करणे म्हणजे पापकर्म! आपण निसर्गाचे रक्षण केले, तरच निसर्ग आपले रक्षण करील. गणेशोत्सव हा आता केवळ धार्मिक उत्सव राहिला नाही, तर तो एक सांस्कृतिक उत्सव बनला आहे. या उत्सवाला चांगले वळण लावण्यासाठी व चुकीच्या गोष्टी बंद होण्यासाठी जनप्रबोधन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. गणेशोत्सवावरचा खर्च कमी करून समाजकार्य केले तर तो सुखकर्ता, दु:खहर्ता, बुद्धिदाता श्रीगणेश अधिक प्रसन्न होईल. 

 

 

आधुनिक कीर्तन

आधुनिक कीर्तन

'मेराकी' हा मुळात ग्रीक शब्द. जे काही कराल ते सृजनशीलतेने, प्रेमाने आणि सकारात्मकतेने करा, असा त्याचा अर्थ. कम्युनिटी बिल्डिंगच्या उद्देशाने पार्ल्यातील चार मित्र-मैत्रिणींनी या नावाने एक ग्रुप सुरू केला. हल्लीच्या जगात संवाद व्हर्चुअल, म्हणूनच काहीसा कृत्रिम झाला आहे, प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे, ही खंत सगळीकडे व्यक्त होते. त्याच पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावर अखंडपणे असणाऱ्या, मात्र एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी वेळ नसलेल्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न या ग्रुपचा असतो. रोजच्या आयुष्यातील काही खास दिवस, सण-समारंभ अथवा काही वेगळे नवनवीन उपक्रम साजरे करण्याच्या हेतूने सर्वांनी एकत्र येऊन त्यातून येणारा आनंदमयी अनुभव एकत्रितपणे घ्यावा हा त्या मागचा मुख्य उद्देश. 

'मेराकी'


'मेराकी' अंतर्गत पहिला कार्यक्रम गेल्या ऑक्टोबर महिन्यात थँक्स गिव्हिंग आठवड्याच्या निमित्ताने झाला. त्यात सुमारे ८०० ते १००० जणांनी एकत्र येऊन सात हजारपेक्षा अधिक कागदाचे क्रेन पक्षी तयार केले. त्यांच्या रंगीबेरंगी माळा करून त्या वेगवेगळ्या रुग्णालयांतील लहानमुलांच्या वॉर्डमध्ये लावण्यात आल्या. त्या बघून तेथील मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अवर्णनीय होता. दुसरा कार्यक्रम जेम्बे वाद्याचा. यात पार्ल्यातील हनुमान रोडवरील एका ठिकाणी जेम्बेसहित विविध वाद्य (नॉन इलेक्ट्रॉनिक) वाजवण्याचा उपक्रम केला गेला. त्यात पारंगत वादकांसोबत वय वर्षे ५ ते ८५ वयोगटातील अनेकांनी सहभाग घेतला होता. 'मेराकी'च्या कार्यक्रमात प्रेक्षकाने केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये, त्याने कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा, याला प्राधान्य दिले जाते. एखाद्या कामाचा किंवा एखाद्या गोष्टीचा केवळ बघून आस्वाद घेणं, यापेक्षासुद्धा त्यात जमेल तसा, आपापल्या पात्रतेप्रमाणे खारीचा वाटा उचलत प्रत्यक्ष करण्याचा अनुभव घेणे ह्यात निश्चित वेगळेपण असतं. 

ह्या शृंखलेतील तिसरा कार्यक्रम रविवार, २५ ऑगस्ट रोजी पार्ल्याच्या प्रबोधनकार क्रीडा संकुलात सकाळी १० ते १२.३० या वेळेत होणार आहे. हा कार्यक्रम आहे आधुनिक कीर्तनाचा. कीर्तन ह्या प्रकारचे भारतीय परंपरेत एक मानाचे असे स्थान असून महाराष्ट्रात तर कीर्तन परंपरेला अधिक महत्त्व आहे. कीर्तन म्हणजे केवळ एक पुरातन सांकृतिक-साहित्य प्रकार, या विचाराला तडा देणारे पुष्कर औरंगाबादकर हे त्यादिवशी एका आगळ्या वेगळ्या विषयावर कीर्तन सादर करणार आहेत. पुण्यात स्थायिक असलेले पुष्करबुवा औरंगाबादकर यांच्या आधीच्या आठ पिढ्या नारदीय कीर्तन परंपरेतील असून कीर्तनाच्याच साच्यामध्ये एक वेगळा अनुभव देणारा असा हा कार्यक्रम असेल. उच्च शिक्षणात मॅनेजमेंटचा अभ्यास करताना मॅनेजमेंटमधील तत्त्व आणि आपल्याला अवगत असलेली कीर्तनकला याची सांगड घालण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा प्रकारचे अनेक प्रयोग त्यांनी यशस्वी केले आहेत. पुष्कर हे स्वतः आयआयएम, कोलकाता येथील पदवीधर असून ते मिलास्टिक एजुकेशन कंपनीचे संचालक आहेत. शैक्षणिक आणि व्यवस्थापन या विषयावरील त्यांची सुमारे अकरा पुस्तके प्रकाशित झाली असून भारतातील अनेक नामांकित विद्यापीठांत ती अभ्यासक्रमासाठी आहेत. अनेक भारतीय तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या एचआरचा भाग म्हणून पुष्कर याचे कॉर्पोरेट कीर्तन आयोजित करण्यात येतं. पारंपरिक कला आणि आधुनिक ज्ञान याचा सुंदर मेळ घालत पुष्कर यांनी एक नवा आदर्श ठेवला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून कीर्तनाच्याच साच्यामध्ये एका वेगळ्या विषयावरील कीर्तनाविष्कार सर्वांना नक्कीच अनुभवायला मिळेल. 

'मेराकी'तर्फे होणारे पुढील कार्यक्रमदेखील अशाच नवनवीन कल्पनांवर आधारित असणार असून अधिकाधिक लोकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आग्रहाचे आवाहन 'मेराकी'तर्फे आयोजकांनी केले आहे. 


अधिक माहितीसाठी संपर्क 


तेजस भावे : ९८६७७९१२९१ 

शिल्पा देशिंगकर : ९८६७३०६३५९ 

भाग्यश्री महाजन : ९७६९२७५१६९ 

सई भावे : ९९२०७१६२४६ 

 

 

रोपवाटिकेला आधुनिकतेचा आयाम

पर्यावरण संतुलित राहण्यात रोप, वृक्ष लागवडीचे महत्व अनन्यसाधारण आहे.  पर्यावरणातील होत असलेले बदल त्याचा शेती व शेती उद्योगावर होत असलेला वाईट परिणाम कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीचा उपयोग करून घेता येतो.  यासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन व व्यवस्थापन या गोष्टीविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. यात रोपवाटिका तथा  नर्सरींचे  स्थान उल्लेखनीय आहे. वेगळ्या पायवाटेने जाणाऱ्याही काही नर्सरी आहेत, त्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठय़ा नर्सरीत समाविष्ट होणाऱ्या शैलेश नर्सरीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर ( ता. शाहुवाडी) येथील सुबोध मनोहर भिंगार्डे यांची शैलेश नर्सरी म्हणजे निसर्गाचा एक अद्भूत चमत्कार आहे.

भारतात रोपवाटिकांचा व्यवसाय फार जुना आहे. रोपवाटिकेतून जातीवंत रोपाची, कलमांची आणि बियाणांची उत्पत्ती, रोपाचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन व संवर्धन निरनिराळ्या अभिवृद्धीतून एकत्रित समुहाने केलेले असते. तिला रोपवाटिका असे म्हणतात. अलिकडे फुलझाडांचा, फळझाडांचा व्यवसाय किफायतशीर होत असल्यामुळे फळझाडांची मागणी वाढत आहे. त्या प्रमाणात जातिवंत रोपांची शास्त्रीयदृष्टय़ा निपज मोठय़ा प्रमाणात होत नाही. परिणामी कमी दर्जाची कलमे , रोपे पुरविली जाण्याची शक्यता असते. याकरिता रोपवाटिकांची संख्या व गुणात्मक वाढ झाली पाहिजे, हा दृष्टीकोन ठेवून  सुबोध  भिंगार्डे कार्यरत आहेत.

भिंगार्डे यांची चौथी पिढी या क्षेत्रात काम करीत आहे. सन १९८३ साली १२०० स्क्वेअर फुटांवर सुरू करून सध्या ३५ एकरात विस्तार झालेला आहे. त्या काळी (१९८३) मलकापूरसारख्या ठिकाणी नर्सरी व्यवसाय सुरू करणे म्हणजे हिमालयात आईस्क्रीम विकण्यासारखे अवघड काम होते. कारण, एवढी वृक्षसंपदा असताना झाडे लावणे वेडेपणाचे समजले जात असे. कृषी पदवीधर असून कोणत्याही नोकरीच्या मागे न लागता भिंगार्डे यांनी आजोबांनी घालून दिलेल्या पायवाटेने पुढे जाण्याचे त्यांनी स्वप्न पाहिले. पुढे वडीलांनी त्यांना मोलाची साथ दिली.

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर मलकापूरपासून रत्नागिरी रोडवर ४ किलोमीटर अंतरावर ही नर्सरी आहे. या ठिकाणी इनडोअर, आऊटडोअर, जंगली रोपे, मसाल्याची रोपे, आषधी वनस्पती तसेच अत्यंत दुर्मिळ वनस्पतींचे संगोपन, संवर्धन व विक्री चालते. त्याचप्रमाणे विविध प्रकारची भारतीय तसेच परदेशी फळझाडे, शोभेच्या झाडांचेसुद्धा उत्पादन व विक्री केली जाते. विविध प्रकारची १५०० हून जास्त प्रकारची रोपे मिळतात. त्याचप्रमाणे अत्यंत दुर्मिळ वनस्पती उदा. स्टेनोकार्पस, मॅनीलोटा, ट्रिपलॅटीस, टॅबूबिया डोनाऊस्मी, अमर्शीया, लोन्काकार्पस इत्यादी.

रोपवाटिकेच्या प्रवासाविषयी भिंगार्डे सांगतात, आज आमची चौथी पिढी या ठिकाणी काम करीत आहे. आजोबांनी शेती चालू केली. आज माझा मुलगा अंगद व सुन मंजिरी व पत्नी अश्विनी यामध्ये पूर्ण वेळ काम पाहतात. सन १९८३ रोजी वडिलांच्या मदतीने १२०० स्क्वेअर फूटमध्ये पेरलेले नर्सरीचे बिज आज ३५ एकरांत विस्तारले आहे. मुलगा व सून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परिसराचा विकास करीत आहेत. गेली ३५ वष्रे ३५ एकरांचा विविध अंगांनी विकास केला आहे. निसर्गप्रेमींमध्ये शैलेश नर्सरीचे नाव, विश्वासार्हता आणि सचोटी यासाठी प्रसिद्ध आहे. शैलेश नर्सरी या नावावर लोकांची पावले आमच्या नर्सरीकडे वळतात. आणि निसर्गाचा आनंद द्विगुणीत करतात. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा हाच आदर्श आम्ही नवीन पिढीपुढे ठेवत आहोत.

वॉकीटॉकीवर नर्सरीचा कारभार

सुमारे ३५ एकरावर पसरलेली नर्सरी सुमारे १०० ते १२५ लोक सांभाळतात. सर्वाशी संपर्कासाठी वॉकीटॉकीचा वापर केला जातो. त्यासाठी १५ वॉकीटॉकी कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत. त्याद्वारे ग्राहकांच्या अडचणी किंवा माहिती एकमेकांना देता येते. व ग्राहक हाताळणे सोपे जाते. नेट बँकिंगचा वापर गेल्या ७ वर्षांपासून होत आहे. डेबीट-क्रेडीट कार्ड स्वीकारले जातात. एकूण विक्रीपकी जवळजवळ ५० टक्के विक्री इंटरनेटद्वारे होते. विविध भागात रोपे पाठविण्यासाठी वाहतुकीची उत्तम व्यवस्था नर्सरीकडून उपलब्ध करून दिली जाते.

२५ गुंठय़ात नर्सरीचे गार्डन सेंटर

सुमारे २५ गुंठे क्षेत्रावर कोल्हापूर-रत्नागिरी हायवेलगत नवीन नर्सरीचे गार्डन सेंटर उभारले जात आहे. त्यामध्ये विविध प्रकारची रोपे तसेच गार्डनसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे गार्डन सेंटर कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील एक महत्त्वाचे ठिकाण होईल, या पद्धतीने विकसित केले जात आहे. या ठिकाणी फॅन्सी कुंडय़ा, हत्यारे, गार्डनसाठी लागणाऱ्या सुबक वस्तू, खते, पुस्तके इ. सर्व काही लॅण्ड स्केिपगसाठी येथे पर्वणीच उपलब्ध होईल.

कालावधीनुसार रोपवाटिका

  • तात्पुरती रोपवाटिका : कमी जागेत व कमी कालावधीमध्ये रोपे तयार केली जातात आणि विक्री करतात.
  • कायम रोपवाटिका : या रोपवाटिकेमध्ये मोठय़ा प्रमाणावर कलमे व रोपे तयार करतात. अशा रोपवाटिका रेल्वे व रोडपासून अगदी जवळ हव्यात. त्यामुळे रोपांची व कलमांची विक्री सोयीची होते.

रोपवाटिकेचे महत्त्व

  • सावकाश वाढ होणाऱ्या झाडाचे रोपवाटिकेत चांगल्याप्रकारे संगोपन करून ती लागवडीसाठी वापरता येतात.
  • कमी जागेत मोठय़ा प्रमाणावर रोपे तयार करता येतात.
  • रोपांचे संगोपन चांगल्या प्रकारे होते.
  • रोपावरील किडी व रोगाचे नियंत्रण करणे सोईचे होते.
  • रोपावर शास्त्रीय अभिवृद्धी करता येते. उदा. डोळे भरणे, भेट कलम, गुटी कलम करणे इत्यादी.
  • रोपांना पाणी, खते वेळेवर देऊन चांगली वाढविता येतात.
  • उत्पादनक्षम व जातीवंत फळझाडांची कलमे व रोपे तयार करता येतात.